शिराळा,ता. ८: शिराळा येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारास शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला . आजच्या बाजारात साडेआठ लाखाची उलाढाल झाली. शिराळा येथे गेल्या आठवड्या पासून जनावरांच्या बाजारास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात पहिल्याच दिवशी पाच लाखांची उलाढाल झाली होती.आज साडे आठ लाखांची झाल्याने या बाजारास दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, कर्मचारी व व्यापारी शशिकांत पाटील, उत्तम माने, अर्जुन पाटील, सतीश कांबळे, सचिन कदम, शिवाजी इंगवले, रघुनाथ पाटील, सर्जेराव घेवदे, सुनील पवार, विजय मोरे, सुनील दिंडे उपस्थित होते. सुनील पवार यांची म्हैस सर्जेराव पाटील, सर्जेराव घेवदे यांची म्हैस भाऊसो जानकर, रघुनाथ पाटील यांची म्हैस संपत तांदळे तसेच शिवाजी इंगवले यांचे बैल सतीश मंडले व इतरांनी खरेदी केले.शिराळा तालुक्यात ७० ते १०० वर्षांची परंपरा असणारे मांगले व चरण येथे भरत असणारे जनावरे बाजार कोरोना काळ व इतर अडचणीमुळे बाजार बंद झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना जनावरे खरेदी व विक्री करण्यासाठी वडगाव व कराड या ठिकाणी जावं लागत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते.आता शिराळा येथे हा जनावरांचा बाजार बाजार समिती मार्फत सुरु करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणुकी होणार नाही.हा बाजार कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी बाजार समिती मार्फत सर्व सुख सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
शिराळा येथे आठवडा बाजारासाठी आलेल्या जनावरांना पाणी मिळावे म्हणून विश्वास घेवदे यांनी सोमवरी भरलेल्या पहिल्या व आज बुधवारी भरलेल्या दुसऱ्या बाजारात जनावरांच्यासाठी टँकरने मोफत पाणी पुरवठा केला .
शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारात येणाऱ्या अडचणी पाहून त्यांना बाजार समितीकडून व्यापारी परवाना, पाण्याची सोय,शौचालय, चारा उपलब्धता, जनावराना लागणारे इतर साहित्य, पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँक कर्ज प्रकरणासाठी लागणाऱ्या पावत्या आणि या व्यतिरिक्त कोणताही पावती कर बाजार समिती घेणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी जास्त आपली जनावरे आणून या संधीचा लाभ घ्यावा.
विजय महाडिक(उपसभापती, बाजार समिती शिराळा)
0 Comments